मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आयकर विभागाच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. याच दरम्यान, घरातून चार मगरी सापडल्या. या प्रकरणाची माहिती वन विभागाला देण्यात आली, त्यानंतर मगरींना रेस्क्यू करण्यात आलं. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, राजेश केसरवानीशी संबंधित काही ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. राजेश हा एक बिडी उत्पादक, इमारत बांधकाम कंत्राटदार आणि माजी भाजपा नगरसेवक आहे. मगरींच्या सापडल्याबद्दल आयकर विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने काहीही सांगितलं नाही.
मध्य प्रदेश वन दलाचे प्रमुख असीम श्रीवास्तव म्हणाले की, या प्रकरणात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगरींची आरोग्य तपासणी केली जात आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती न्यायालयाला दिली जाईल आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. असीम श्रीवास्तव यांनी एकूण किती मगरी सापडल्या आणि ते कोणाचे घर होतं हे स्पष्ट केलं नाही. घरातून एकूण चार मगरी सापडल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
वन विभागाने मगरींना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी पाठवण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, या मगरींची प्रकृती सामान्य आहे आणि आरोग्य तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना शिफ्ट केलं जाईल. घराजवळ मगर सापडल्याच्या या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. मगरी घरात का ठेवल्या होत्या यावर जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.