नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात रोख व्यवहार करण्याऐवजी ई-पेमेंट सुविधेचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ई-पेमेंटचा वापर करणे साथीच्या काळात सुरक्षित आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.आर्थिक व्यवहारांसाठी चलनी नोटांचा वापर करणे साथीच्या काळात धोकादायक आहे. नोटांसोबत विषाणूचा प्रसार होण्याचा फार मोठा धोका आहे. याकडे जाणकारांनी याआधीच लक्ष वेधले आहे. भारतात बहुतांश व्यवहार अजूनही रोखीनेच होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बॅडमिंटनपटू श्रीकांत कदंबी, क्रिकेटपटू स्मृती मंदाना, सिक्वाया इंडियाचे रंजन आनंदन आणि आरिन कॅपिटलचे चेअरमन मोहनदास पै यांनी लोकांना ई-पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मोदी यांनी टिष्ट्वट केले आहे. मोदींनी म्हटले की, ‘सामाजिक दूरता पाळणे ही आजच्या काळाची गरज आहे. डिजिटल पेमेंट्स त्यासाठी तुम्हाला मदत करील. या चार मोठ्या लोकांचे ऐका आणि डिजिटल पेमेंटचा वापर करा.’दरम्यान, वित्त मंत्रालय आणि बँका यांनीही ई-पेमेंट साधने वापरण्याचे आवाहन स्वतंत्रपणे केले आहे. वित्तीय सेवा सचिव देबाशिष पांडा यांनी टिष्ट्वटरवर एक व्हिडीओ जारी करून लोकांना आवाहन केले की, ‘तुम्हाला जर पेमेंट्स करायचे असेल, तर ते डिजिटल माध्यमातून करा आणि सुरक्षित राहा.’
Coronavirus : सुरक्षिततेसाठी वापर करा ई-पेमेंटचा; पंतप्रधान मोदी यांचे देशवासीयांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:14 IST