काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यात ६३ वर्षांच्या व्यक्तीचे कोविड-१९ मुळे निधन झाले. नातेवाईक, गावकरी कोणीच पुढे न आल्याने प्रशासनातील व्यक्तींनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार पार पाडले. या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली संवेदनशील भूमिका प्रशंसनीय होती. पण ही घटना फार अस्वस्थ करणारी होती. लागण होण्याच्या भीतीपायी दिली गेलेली टोकाची प्रतिक्रिया, असे या घटनेचे थोडक्यात वर्णन करता येईल. नातेवाईक-गावकरी मृत व्यक्तीला बघायला, स्मशानापर्यंत यायला, अंत्यसंस्कार करायला तयार नसणे, अॅम्बुलन्सचा ड्रायव्हर शव वाहून न्यायला तयार नसणे, मृतदेह वाहून नेणाऱ्या व्यक्तींनी केलेला अंतराळवीरासारखा नखशिखांत पेहेराव, अग्नी दिल्यानंतरही राखेची, जमिनीची केली गेलेली जंतुनाशक फवारणी हे सगळे या भीतीचे आविष्कार. यामुळे नक्की काय साधले, असा प्रश्न त्यातून उपस्थित होतो. भावनांना क्षणभर आवर घालत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून याकडे पाहिले तर या प्रश्नांची उत्तरे मिळतात...‘कोविड-१९’ हा श्वसनसंस्थेचा आजार आहे. लागण झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे, खोकणे, बोलणे, थुंकणे या क्रियांमधून कोरोना विषाणू बाहेर फेकला जातो. अर्थात, मृत्यूनंतर या मागार्तून होणारा प्रसार थांबतो. मृताच्या श्वसनमार्गातील स्रावांचा इतरांशी संपर्क आला तरच लागणीची शक्यता राहते. मग ही शक्यता कशी कमी करता येईल?केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मृत व्यक्तीच्या नाका-तोंडात किंवा इतरत्र घातलेल्या नळ्या सोडियम हायपोक्लोराईटच्या (ब्लिच) द्रावणात बुडवून त्यांची विल्हेवाट लावणे, नाका-तोंडातून, उघड्या जखमांतून स्राव बाहेर पडू नये, याची खबरदारी घेणे, मृत शरीराला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळणे, ती पिशवी बाहेरून ब्लिचने पुसून घेणे, त्यावर दुसरे आवरण घालणे, त्या व्यक्तीचे कपडे, वस्तू, तिथली जागा या सगळ्याची स्वच्छता ब्लिच वापरून करणे या गोष्टी गरजेच्या आहेत.हे सगळं हॉस्पिटलचे कर्मचारी करतील. ते करताना ग्लोव्ह्ज, एन-९५ मास्क, प्लॅस्टिक अॅप्रॉन इत्यादी घालणे आवश्यक आहे. ही सर्व काळजी घेतल्यानंतर मृतदेह हाताळणाºया व्यक्ती, वाहनचालक यांनी हातात ग्लोव्ह्ज, तोंडाला मास्क लावला पाहिजे. मृतदेह घरी न नेता हॉस्पिटलमधून परस्पर स्मशानभूमीवर नेला पाहिजे. अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांनी सध्याच्या काळात घ्यायची काळजी येथेही लागू पडते. अशा दु:खद प्रसंगी डोळ्यात अश्रू येणे, आधारासाठी-सांत्वनासाठी आपला माणूस जवळ असावा अस वाटणे साहजिक आहे. पण या भावनांना आवर घालत, मास्क वापरणे, तोंड-नाक-डोळ्यांना हात न लावणे, वारंवार हात धुणे, इतरांपासून किमान ३-६ फुटांचे अंतर राखणे, घरी आल्याबरोबर अंघोळ करणे, कपडे धुवायला टाकणे आवश्यक आहे. अग्नी दिल्यानंतरच्या राखेत किंवा दफन केलेल्या मातीत विषाणू जिवंत शिल्लक राहू शकत नसल्याने त्यावर जंतुनाशक टाकायची आवश्यकता नाही.संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत. पण साताºयासारखे प्रसंग गैरसमज पसरवतात, धास्ती वाढवतात. यातून अनेक अनावश्यक कृती घडत राहतात. आजार, मृत्यूची भीती यामध्ये भेदभाव, दूषणांची भर पडली तर त्याचा परिणाम आजार लपवणे, डॉक्टरांकडे न जाणे असा होऊ शकतो. यापूर्वी अनेक आजारांच्या साथींमध्ये असा अनुभव आला आहे.वैज्ञानिक तथ्ये समजून घेतली तर आपण अनाठायी भीतीवर मात करत स्वत:ची योग्य काळजी घेऊ शकू. ‘कोविड-१९’विरुद्धच्या युद्धात एक व्यक्ती म्हणून आपले हे योगदान महत्त्वाचे असेल.- डॉ. रितू परचुरे, प्रयास आरोग्य गट, पुणे
CoronaVirus: रुग्णाचे अंत्यसंस्कार करताना अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:07 IST