नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. त्याबद्दल केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. आता नीती आयोगानंदेखील कोरोना स्थितीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. पुढील १०० दिवस देशासाठी महत्त्वाचे असतील, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी तिसऱ्या लाटेचा धोका बोलून दाखवला.
'कोरोनाची दुसरी लाट ओसर असली तरीही ७३ जिल्ह्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. या जिल्ह्यांमध्ये दररोज १०० हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. ४७ जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या २५ दिवसांतील देशाचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांच्या खाली आहे. पुढील १०० दिवस भारतासाठी महत्त्वाचे आहेत,' असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या संपूर्ण जग तिसऱ्या लाटेच्या दिशेनं जात आहे. स्पेनमध्ये एकाच आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा ६४ टक्क्यांनी वाढला आहे. नेदरलँडमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा तब्बल ३०० टक्क्यांनी वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेला धोक्याचा इशारा संपूर्ण जगासाठी आहे. आपल्याला तो समजून घ्यायला हवा. अद्यापही देशात हर्ड इम्युनिटी तयार झालेली नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ती बिघडू शकते, असं पॉल यांनी सांगितलं.
डॉ. व्ही. के पॉल यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीचा संदर्भ देत नागरिकांना लसीकरणासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. 'कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मृत्यू होण्याचा धोका ९५ टक्क्यांनी कमी होतो. तर एका डोसमुळे मृत्यूचा धोका ८२ टक्क्यांनी घटतो,' अशी माहिती त्यांनी दिली.