नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. मात्र कोरोना विषाणूचं बदलतं स्वरुप चिंतेचं कारण ठरत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. आता त्याच डेल्टा व्हेरिएंटचं म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. डेल्टा प्लस लस आणि रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.जगभरात 5.5 कोटी लसींचे वितरण करणार अमेरिका, भारतासह आशियाई देशांना मिळणार लस
डेल्टा प्लस व्हेरिएंट लसीसोबतच आधीच्या संक्रामणामुळे विकसित झालेल्या रोगप्रतिकारशक्तीलादेखील चकवा देऊ शकतो, असं देशातील प्रमुख वायरोलॉजिस्ट आणि INSACOGचे माजी सदस्य प्रोफेसर शाहीद जमील यांनी सांगितलं. 'ओरिजनल डेल्टा व्हेरिएंटमध्ये आढळून आलेली सर्व लक्षणं डेल्टा प्लसमध्ये आढळून आली आहेत. याशिवाय डेल्टा प्लसमध्ये K417N म्युटेशनदेखील आढळून आलं आहे. हे म्युटेशन दक्षिण आफ्रिकेतील बीटा व्हेरिएंटमध्ये आढळून आलं होतं,' अशी माहिती जमील यांनी दिली.देशात गेल्या २४ तासांत ५३ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८८ दिवसांतील कमी संख्या
बीटा व्हेरिएंटविरोधात लस फारशी प्रभावी ठरत नाही, याची आम्हाला कल्पना आहे. लसीला चकवा देण्याची क्षमता बीटा व्हेरिएंटमध्ये अधिक आहे. तितकी क्षमता अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटमध्ये नाही, असं जमील यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकन सरकार ऍस्ट्राझेनेकाच्या लसींचा साठा परत पाठवला होता. ऍस्ट्राझेनेकाची लस तिथल्या व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत नसल्याचं आफ्रिकन सरकारनं लसींचा साठा परत पाठवचाना सांगितलं होतं, याकडेही जमील यांनी लक्ष वेधलं आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात ऍस्ट्राझेनेका लस वापरली जात आहे. ती कोविशील्ड नावानं उपलब्ध असून तिची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं केली आहे.