नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. कोरोनाच्या संकटात आपलेही परके झाले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. मुलाने आणि सुनेनेही पाठ फिरवली. त्यामुळे पतीवर मुलीकडून पैसे उधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.
वडिलांनी पालनपोषण करून मुलाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सक्षम केले आणि आता वृद्धापकाळात मुलाने आई-वडिलांना वाऱ्यावर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला असतानाही मुलाने वडिलांना सहकार्य केलं नाही. त्यामुळे मुलीच्या मदतीने पतीने अंत्यसंस्कार केले आहेत. वडिलांनी मुलाची तक्रार केली असून ज्येष्ठ नागरिक पंचायतीने मुलगा आणि सुनेला बोलावून समुपदेशन करून धडा शिकवला आहे. सुनेला आपली चूक लक्षात आली आणि आता तिने सासऱ्यांची पूर्ण काळजी घेऊन त्यांचे पालनपोषण करण्याचे आश्वासन दिले आहे.
मुलीकडून पैसे घेऊन पत्नीवर केले अंत्यसंस्कार
मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय नागरिक मुलाची तक्रार घेऊन पंचायतीमध्ये पोहोचले होते. मुलगा लक्ष देत नाही. पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाला, पण मुलाने सहकार्य केले नाही. आपल्या मुलीकडून पैसे घेऊन पत्नीचे अंत्यसंस्कार करावे लागले असं वडिलांनी म्हटलं आहे. तसेच पोलिसांनी मुलगा व सुनेला बोलावून वृद्धासोबत असे वागू नये, त्यांची देखभाल करावी, असे समजावून सांगितलं. कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.