सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: कॉन्स्टेबल मुनीर अहमद याला बरखास्त करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सीआरपीएफने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात त्याचा पाकिस्तानी मुलीशी गुप्त विवाह, बनावट दस्तावेज व संवेदनशील माहिती लपवण्यासारख्या गंभीर कृत्यांचा हवाला दिला. ही कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, असे म्हटले आहे.
सीआरपीएफने म्हटले की, मुनीर अहमदने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्याशिवाय फेब्रुवारी २०२५मध्ये पर्यटक व्हिसावर भारतात आलेली पाकिस्तानी नागरिक मेनल खानशी विवाह केला होता. त्याने विवाहाची बाब लपवली व विवाहाच्या कागदपत्रांवर बनावट हस्ताक्षरही केले.
मेनल खानचा व्हिसा संपल्यावर अधिकाऱ्यांना माहिती न देता तिच्या दीर्घकालिक व्हिसासाठी अर्ज करण्यात मदत केली. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर तो सुटीवर गेला. तो त्याच्या पदामुळे संवेदनशील ठिकाणी जाऊ शकत होता, लष्कराच्या हालचालीसंबंधी माहिती घेऊ शकत होता. त्याच्या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकली असती. मुनीर अहमद याने त्याच्या बरखास्तीला आव्हान दिले आहे. आपले स्वच्छ रेकॉर्ड, विवाहाबाबत सीआरपीएफ अधिकाऱ्यांशी संवाद, पत्नीच्या व्हिसा नियमितीकरणासाठी भाजप खासदारांच्या पत्रांचा हवाला दिला आहे.