Election, Aadhar Card: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आज केली. राज्याचे मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या शिष्टमंडळाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि आयुक्त डॉ. विवेक जोशी यांची भेट घेतली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.
मंत्री सामंत म्हणाले की, निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांच्या शिष्टमंडळाची आणि पक्ष प्रमुखांशी चर्चा करण्याचा एक चांगला उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पक्षाचा अभिप्राय कळवला.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडता येईल का, याबाबत निवडणूक आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्याचे मंत्री सामंत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मुंबईसारख्या मोठ्या शहरात बांग्लादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादींची छाननी होणे आवश्यक आहे. मतदार यादीत बांग्लादेशी नागरिकांची नावे असल्यास ती वगळण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या धनुष्यबाणाच्या सुनावणीसंदर्भात भेट घेतल्याचे वृत्त मंत्री सामंत यांनी खोडून काढले.