नवी दिल्ली : संसदेतून गुन्हेगारांचा सफाया करण्याचे आश्वासन प्रचारादरम्यान देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता आपल्या मंत्रिमंडळात आणखी काही कलंकित मंत्र्यांना सामील केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला आहे. मंत्र्यांच्या खात्यात बदल करणो फारसे तर्कसंगत वाटत नाही. वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सूचना व प्रसारण मंत्रलयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या दोन्ही मंत्रलयांचा परस्परांशी कसलाही संबंध नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी म्हटले आहे. नवनियुक्त मंत्री वाय. एस. चौधरी यांच्या कंपनीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले 317.6 कोटी रुपये कर्ज अद्याप फेडलेले नाही, असा आरोप करून माकन यांनी चौधरींच्या राजीनाम्याची मागणी केली. या आरोपाची पुष्टी करणारे बँकेचे दस्तऐवजही त्यांनी पत्रकारांना दाखविले. रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन वादग्रस्त मंत्री सामील केले आहेत. दरम्यान, भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)