शीलेश शर्मा, नवी दिल्लीमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला प्रत्युत्तर म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी काँग्रेसने राजधानीत आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे़ या संमेलनात जगातील अनेक बडे नेते, विचारवंत व दिग्गजांची हजेरी राहणार आहे़ विशेष म्हणजे या भव्य सोहळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची सावली पडू नये म्हणून काँग्रेस आटोकाट प्रयत्न करीत आहे़ त्याच प्रयत्नांतर्गत पंतप्रधानांना या सोहळ्याचे निमंत्रण न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे़सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोहळा म्हणजे इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीकडे मोदी सरकारने केलेल्या दुर्लक्षाला प्रत्युत्तर असेल़ या संमेलनात सहभागी होणाऱ्यांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहे़त. विदेशी मान्यवरांना या संमेलात सहभागी होण्यापासून कसे रोखता येईल, असे प्रयत्न मोदी सरकारकडून झाल्यामुळेच काँगे्रस ही गोपनीयता पाळत आहे़ पक्षाच्या एका बड्या नेत्याने सांगितल्यानुसार, काही विदेशी नेत्यांनी आधी निमंत्रण स्वीकारले पण यानंतर अचानक येण्यास असमर्थता दर्शवली़ हे सर्व सरकारच्या दबावामुळे होत असल्याचे शोधाअंती काँग्रेसला कळून चुकले़ त्यामुळे काँग्रेसने आता या संमेलनाबाबतची कुठलीही माहिती परराष्ट्र मंत्रालयाला न कळविण्याचे धोरण स्वीकारले आहे़ येत्या ९ नोव्हेंबरला काँग्रेस या संमेलनाबाबत घोषणा करणे अपेक्षित आहे़नेहरूंचा वारसा जगाला कळावा म्हणून आंतरराष्ट्रीय संमेलन घेण्यासोबतच देशातही ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसकडून केले गेले आहे़ मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या तालकटोरा येथे होईल़ यात काँगे्रसअध्यक्षा सोनिया गांधी पक्ष कार्यकर्त्यांना नेहरूंचा वारसा चिरंतन ठेवण्याची शपथ देतील़ दिल्लीसोबत प्रत्येक राज्यांच्या राजधानीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश पक्ष शाखांना देण्यात आले आहेत.
इंदिराजींकडे दुर्लक्ष करणा-या मोदी सरकारला काँग्रेस देणार प्रत्युत्तर
By admin | Updated: November 6, 2014 03:09 IST