ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ३ - काँग्रेसने केंद्रातील एनडीए सरकारमधील त्रुटी शोधण्यापेक्षा राहुल गांधींचा शोध घ्यावा असा खोचक टोला भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला आहे. तर अमित शहांनी राहुल गांधींची चिंता करण्याऐवजी केंद्र सरकारमधील सुशासनावर लक्ष केंद्रीत करावे असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.
शुक्रवारी बंगळुरुत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवसीय संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनात अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधक एनडीए सरकारमधील त्रुटी शोधत आहेत, पण सरकारच्या कारभारात त्रुटीच नाही. काँग्रेसने यापेक्षा त्यांनी स्वतःच्या नेत्याचा शोध घ्यावा असे अमित शहा यांनी म्हटले आहे. या संमेलनात भाजपाने भूसंपादन विधेयकावर जास्त भर दिला आहे. भूसंपादन विधेयकाच्या समर्थनार्थ देशभरात रॅली काढण्याचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी आता बिहार निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आदेशही शहांनी या संमेलनात दिले.