ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - गुजरातमधील खोल समुद्रातील पाकच्या संशयास्पद बोटीवरील कारवाईवर रविवारी काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्र सरकार याआधारे खळबळ माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला असून काँग्रेसच्या या आरोपावर भाजपाने संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे पाकमधील बोटीवरुन भारतातील राजकारण भलतेच तापल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुजरातमधील पोरबंदर येथे ३१ डिसेंबर रोजी पाकमधून संशयास्पद बोट आली होती. तटरक्षक दलाने या बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चौघांनी बॉम्बस्फोट घडवून बोट उडवली. तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ला टळला असा दावा केंद्रातर्फे केला जात आहे. संशयास्पद बोटीवरील चौघे जण पाक सैन्याच्या संपर्कात होते असेही समोर येत आहे. मात्र याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असले तरी दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्यानेच ही बोट भारतीय हद्दीत आली होती हे स्पष्ट करणारा कोणताही ठोस पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. रविवारी काँग्रेसचे नेते अजॉय कुमार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'पाकमधून आलेल्या बोटीविषयी अनेक पैलू समोर येत आहेत. पण यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात होता हेदेखील अस्पष्टच आहे.त्यामुळे केंद्र सरकारने याविषयी ठोस स्पष्टीकरण द्यावे' अशी मागणी अजॉय कुमार यांनी केली आहे.
काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करताच भाजपानेही यावर नाराजी व्यक्त केली. तटरक्षक दलाच्या सतर्कतेचे कौतुक करण्याऐवजी काँग्रेस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ही बाब निंदनीय आहे असे भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे याद्वारे काँग्रेस पाकिस्तानच्या भूमिकेला पाठबळ देत आहे असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसला काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रसारमाध्यमांऐवजी थेट सरकारकडे विचारणा केली पाहिजे होती. गोपनीय माहितींविषयी उघड चर्चा होत नाही असे त्यांनी नमुद केले.