नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी घेत माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विदर्भात काँग्रेसची झालेली वाताहत पाहता येथे नव्या दमाने पक्षसंघटना उभी करण्यासाठी माजी खा. विलास मुत्तेमवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्याच्या हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्या वेळीच ठाकरे यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्व बदल नको, असे मत काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केल्याने ठाकरे यांना अभय मिळाले होते. यानंतर विधानसभेत काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली. विदर्भात तर काँग्रेस सपाट झाली. शिवाय माणिकरावांचे चिरंजीव राहुल यांचे यवतमाळातून डिपॉझिट गेले. अशा परिस्थितीत विदर्भात काँग्रेसला भक्कम करण्यास प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील नेत्याकडेच सोपवावे, असा विचार पुढे आला असून, मुत्तेमवार यांचे नाव आघाडीवर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीत लवकरच हायकमांड याबाबत एक बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. (प्रतिनिधी)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मुत्तेमवारांकडे ?
By admin | Updated: October 22, 2014 06:26 IST