शीलेश शर्मा, नवी दिल्लीगुजरातेतील हवाला व्यवहार आणि क्रिकेट बेटिंगमध्ये भाजपा नेते सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुद्यावर गप्प का? असा सवाल काँग्रेसने केला आहे.अंमलबजावणी संचालनालयाने चार कोटी रुपयांचे बेटिंग तसेच हवाला व्यवहाराचा पर्दाफाश केला असताना हे प्रकरण दडपण्याचे भाजपा सरकारचे प्रयत्न का? संचालनालयाच्या वारंवार दिलेल्या इशाऱ्यानंतरही राज्य पोलीस आणि सरकारने अद्याप या प्रकरणी कारवाई का केली नाही? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने केली आहे. गुजरातचे काँगे्रस प्रवक्ते अमी याग्निक यांनी शुक्रवारी हा मुद्दा उपस्थित केला. २० मार्च २०१५ रोजी अंमलबजावणी संचालनालयाने सिकंदरपूर, वडोदरा येथील वैभवी फर्मवर छापेमारी करीत विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यानच्या बेटिंगचा प्रकार उजेडात आणला होता. याचे तार गुजरात आणि लंडनशी जुळले असल्याचे पुरावे मिळाले आहे. यात ब्रिटनचे सोढी यांच्यासह गुजरातचे परेश भाटिया, गिरीश पटेल ऊर्फ टॉमी पटेल, किरण माला धार्मिन चौहान, चिराग पारीख यांचा कथित सहभाग आहे. यापैकी गिरीश पटेल भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. भाजपाच्या नेतृत्वाशी त्यांचे संबंध असल्याचे मानले जात आहे. याबाबत तथ्य आणि पुरावे मिळाले असल्याचे याग्निक यावेळी म्हणाले. सट्टेबाजीच्या काळ्या धंद्यात पोलीस महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि काही बडे राजकीय दिग्गज गुंतले असल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाकडे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपा बड्या नेत्यांचे अभय असल्याशिवाय एवढे मोठे रॅकेट चालवणे शक्य नसल्याचे, धाडीदरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि संगणकातून मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. याबाबतचे काही कागदोपत्री पुरावेही त्यांनी सादर केले.
बेटिंगबाबत कॉँग्रेसचा मोदींना खडा सवाल
By admin | Updated: April 3, 2015 23:43 IST