बंगळुरू : टीआरपी वाढविण्यासाठी मीडिया बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या बातम्या अतिरंजित करून सादर करते, अशी टिपणी कर्नाटकचे गृहमंत्री के.जे़ जॉर्ज यांनी केली असून या आक्षेपार्ह टिपणीनंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे़ दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी कानावर हात ठेवले आहेत़ मला याबाबत काहीही ठाऊक नाही़ जॉर्ज नेमके काय बोलले, हे जाणून घेत मी त्यांच्यासोबत चर्चा करेल, असे सिद्धरामय्या म्हणाले़शाळांमध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांच्या मुद्यावरून सध्या कर्नाटक सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे़ काल बुधवारी या मुद्यावर बोलताना गृहमंत्री जॉर्ज यांनी मीडियावर आगपाखड केली होती़ मीडिया टीआरपी वाढविण्यासाठी लैंगिक शोषणाच्या बातम्या अतिरंजित करून दाखवत असून बंगळुरूला ‘बलात्काराचे शहर’ म्हणून सादर करीत आहे़ चांगल्या बातम्या दाखवा, ते चांगले राहील, असे जॉर्ज म्हणाले होते़ त्यांच्या या टिपणीवर आज गुरुवारी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या़ बीपीएसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बी़एस़ त्रापर यांनी पत्रपरिषदेत जॉर्ज यांच्या या टिपणीची निंदा केली़ माझ्या मते, गृहमंत्री मीडियाच्या डोक्यावर खापर फोडून स्वत:चा बचाव करीत आहेत, असे त्रापर म्हणाले़ (वृत्तसंस्था)
कानडी गृहमंत्र्यांची मीडियावर टीका
By admin | Updated: November 7, 2014 04:17 IST