जम्मू : उधमपूर अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाच्या हाती लागलेला लष्कर- ए- तय्यबाचा अतिरेकी मोहम्मद नावेद याकूब याच्या चौकशीतून रोज नवी माहिती समोर येत आहे. सीमेपलीकडून जम्मू- काश्मिरात घुसखोरी करणारा नावेद आणि त्याच्या एका सहकाऱ्यावर बाजारस्थळांना लक्ष्य करण्याचे ‘मिशन’ सोपविण्यात आले होते. या मिशनवर नावेदसोबत आलेला त्याचा एक सहकारी अबू ओकासा अंतिम क्षणी बिचकला आणि हे ‘मिशन’ फसले. खुद्द नावेदनेच ही माहिती दिली.गत जूनमध्ये लष्कर- ए- तय्यबाची चार जणांची टोळी गुलमर्ग सेक्टरमधून खोऱ्यात आली होती आणि शेजारच्या सांबा जिल्ह्याच्या बारी ब्राह्मणा येथे गेली होती. नावेद आणि त्याचा सहकारी या टोळीचा भाग होते. येथे एका बाजारपेठेला लक्ष्य करण्याची त्यांची योजना होता. या बाजारात भारतीय जवानांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. नावेद आणि अबू ओकासा २० जुलैला जम्मू शहराच्या बाहेरील भागात आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ होते. मात्र, १७ वर्षीय अबू अचानक ओरडायला लागला. ज्या मिशनवर तो आला त्याबद्दल त्याचे मन बदलले होते. अबू मोठमोठ्याने रडू लागला. भीतीने त्याचे अंग थरथरू लागले. यामुळे मिशन अपयशी राहिले आणि त्यांना ते अर्धवट सोडून काश्मीर खोऱ्यात परतावे लागले होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नावेदने चौकशीदरम्यान याचा खुलासा केला. अटक करण्यात आलेला ट्रक ड्रायव्हर खुर्शीद अहमद यानेही याला दुजोरा दिला. अहमद यानेच नावेद आणि अबूला बारी ब्राह्मणी येथे पोहोचवले होते.अबू आणि नावेद यांच्याशिवाय दोन अन्य अतिरेक्यांनीही त्यांच्या सोबत घुसखोरी केली होती. झारगम ऊर्फ मोहम्मद भाई आणि मोहम्मद नोमान ऊर्फ मोमीन, अशी त्यांची नावे होती. नोमान ५ आॅगस्टला नावेदसोबत होता आणि भारतीय सैन्यासोबतच्या चकमकीत ठार झाला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने अबू आणि झारगमबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. नावेदने आपला सहकारी मोहम्मद नोमान ऊर्फ मोमीन याच्यासोबत मिळून गत ५ आॅगस्टला उधमपूर येथे भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता.
सहकारी बिचकला अन् ‘मिशन’ फसले
By admin | Updated: August 30, 2015 22:13 IST