ये हादसों का शहर है...
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच : ४० तासांत ८ बळी
ये हादसों का शहर है...
अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच : ४० तासांत ८ बळी नागपूर : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालविणारे निरपराध नागरिकांचे बळी घेत आहेत. या दोन अपघातामुळे गेल्या ४० तासांत अपघातात ठार झालेल्यांची संख्या ८ झाली आहे. मोरभवन परिसरात सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भीषण अपघात घडला. लकीनारायण कालीचरण कुर्मी (वय ६४) आणि त्यांची पत्नी लीलाबाई (वय ६०, दोघेही रा. इंदिरा मातानगर, एमआयडीसी) उपचारासाठी मेडिकलमध्ये गेले होते. हे गरीब दाम्पत्य घरी जाण्यासाठी मोरभवन बसस्थानकावर आले. दोघेही एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडत असताना एसटी बसने (एमएच ४०/एन ८७१८) लीलाबाईंना चिरडले. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. सीताबर्डी पोलिसांनी लकीनारायण कुर्मी यांच्या तक्रारीवरून आरोपी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. सोमवारी क्वॉर्टर परिसरातील रहिवासी रामदास सोनबाजी गाडगे (वय ६४) हे पत्नीसह रविवारी सकाळी ११.१५ ला चिंचभुवन परिसरात लग्नाला जात होते. सोनेगावच्या उड्डाणपुलावर त्यांच्या प्लेझर दुचाकीला एका कारचालकाने कट मारला. त्यामुळे गाडगे दाम्पत्य खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास डॉक्टरांनी रामदास गाडगे यांना मृत घोषित केले. जितेंद्र नामदेवरावजी डांगोरे (वय ३६, रा. पारडसिंगा,ता, काटोल) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे. ---कसे थांबणार अपघात एकीकडे शहरातील रस्ते गुळगुळीत करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे बेदरकारपणे वाहन चालविणारे या रस्त्यावर रक्ताच्या चिरकांड्या उडवीत आहेत. अवघ्या ४० तासांत उपराजधानीच्या विविध भागात एका चिमुकल्यासह ८ जणांचे बळी गेले तर, ९ जण गंभीर जखमी आहेत. मृतात धमतीर(छत्तीसगड)मधील लोढा परिवारातील ४ सदस्य, दिघोरी नाक्याजवळचा सम्यक देवीदास मेश्राम, फौजिया रशीद अली ही यशोधरानगरातील तरुणी तसेच उपरोक्त दोघांचा समावेश आहे. जखमींमध्ये लोढा परिवारातील ५ जण, फौजियाच्या बहिणीचा पती, रामदास गाडगे यांची पत्नी आणि गोरक्षणसमोर भरधाव कारचालकाने धडक दिलेले दोघे दुचाकीस्वार यांचा समावेश आहे. या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कसे थांबणार अपघात, असा प्रश्न चर्चेला आला आहे.