चर्चिलला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी
By admin | Updated: August 13, 2015 23:24 IST
पणजी : जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जरच्या लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यास गुरुवारी येथील विशेष न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 5 ऑगस्ट रोजी रात्री चर्चिलला क्राईम ब्रँचने अटक केली होती. चर्चिलच्या जामीन अर्जावर गुरुवारी दुपारी युक्तिवाद झाले. चर्चिलचे वकील अशोक मुंदरगी यांनी युक्तिवाद केले.
चर्चिलला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी
पणजी : जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जरच्या लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव यास गुरुवारी येथील विशेष न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 5 ऑगस्ट रोजी रात्री चर्चिलला क्राईम ब्रँचने अटक केली होती. चर्चिलच्या जामीन अर्जावर गुरुवारी दुपारी युक्तिवाद झाले. चर्चिलचे वकील अशोक मुंदरगी यांनी युक्तिवाद केले. लुईस बर्जर कंपनीला सल्लागार म्हणून 2009 मध्ये काम दिले होते, मग 2010 साली आलेमाव कोणत्या कारणास्तव लाच स्वीकारतील, असा प्रश्न अँड. मुंदरगी यांनी युक्तिवादावेळी उपस्थित केला. 2010 साली आलेमाव यांचे नियंत्रण नव्हते; कारण 2009 मध्येच लुईस बर्जरला काम मिळाले होते, असे मुंदरगी म्हणाले. जैकाशी संबंधित फाईल्स आलेमाव यांनी कधी दाबून ठेवल्या व त्या निकालात काढण्यासाठी कधी लाच मागितली ते वर्ष क्राईम ब्रँचने नमूद केलेले नाही, असे मुंदरगी म्हणाले. 7 जून 2007 रोजी केंद्र सरकार, गोवा सरकार व जैका यांच्यात करार झाला. 26 मे 2009 रोजी लुईस बर्जरला सल्लागार कामाचे कंत्राट दिले गेले. 19 जून 2009 रोजी लुईस बर्जरला वर्क ऑर्डर दिली. 16 ऑगस्ट 2009 रोजी चर्चिल हे बांधकाममंत्री बनले. तत्पूर्वी सुदिन ढवळीकर बांधकाममंत्री होते. मग एक वर्षाने चर्चिल हे कोणत्या कारणासाठी लुईस बर्जरकडे लाच मागतील, असा प्रश्न मुंदरगी यांनी केला. केंद्र सरकारमार्फत तत्पूर्वीच बिले फेडली होती, असेही मुंदरगी म्हणाले. चर्चिलला लाच दिल्याचा दिवस, वेळ व लाचेच्या रकमेचा आकडा पोलीस मुद्दाम लपवत आहेत; कारण त्यातून खरे काय ते कळून येईल, असे मुंदरगी म्हणाले. आलेमाव यास का अटक करण्यात आली व एक फाईल शोधण्यासाठी अटकेनंतर पाच दिवसांनी त्याच्या घरी व कार्यालयावर पोलिसांनी छापा का टाकला, अशी विचारणा मुंदरगी यांनी केली.क्राईम ब्रँचच्या वकिलांचे युक्तिवाद आज शुक्रवारी होणार आहेत. .......