कानपूर : एप्रिल महिन्याची १ तारीख म्हणजे मूर्ख बनविण्याची पर्वणी! परंतु जालौन जिल्ह्यातील एका कुटुंबासाठी मात्र ही गंमत जिवाचा आकांत करणारी ठरली. आपल्या तरुण मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त कळल्यानंतरही कुणीतरी ‘एप्रिल फुल’ बनविले असणार असाच त्यांचा समज झाला आणि हे कुटुंब घटनास्थळीही पोहोचलेच नाही. त्याचे झाले असे की, जालौन जिल्ह्यात राहणाऱ्या २४ वर्षीय अंकित नामक युवकाने बुधवारी म्हणजे १ एप्रिलला शहराबाहेरील गोविंदपुरी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जवळील मोबाईलवरून ओळख पटल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना दूरध्वनी करून घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला; परंतु कुणीतरी एप्रिल फुल बनवीत असल्याचे समजून हे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचलेच नाही. एप्रिल फुल बनवू नका, असे सांगून त्यांनी पोलिसांचा फोन बंद केला. दरम्यान, चार तासांच्या प्रतीक्षेनंतर अंकितचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. (वृत्तसंस्था)
मुलाची आत्महत्या वाटली ‘एप्रिल फुल!’
By admin | Updated: April 2, 2015 23:54 IST