हरीश गुप्ता, नवी दिल्लीहरियाणाचा नवा मुख्यमंत्री कोण राहील, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: घेणार आहेत. भाजपाचे संसदीय मंडळ आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे मुख्यमंत्री निवडीत महत्त्वाची भूमिका बजावणार असले तरी हा नवा मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय मोदीच घेतील.विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सर्व ९० जागांवर सशक्त उमेदवार देण्यात अपयशी ठरलेल्या आणि अन्य सर्व पक्षांमधून बाहेर पडलेल्या बंडखोरांना ऐन वेळी तिकीट देणाऱ्या भाजपात निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदाचे डझनभर उमेदवार आश्चर्यकारकपणे पुढे आले आहेत. केंद्रीय नियोजन (स्वतंत्र कार्यभार) आणि संरक्षण राज्यमंत्री राव इंदरजित सिंग आणि भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री किशनपाल गुज्जर हे मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत शीर्ष स्थानावर आहेत. याशिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा, काँग्रेसचा त्याग करून आणि राज्यसभेच्या खासदारकीचाही राजीनामा देऊन नुकतेच भाजपात सामील झालेले चौधरी बिरेंदर सिंग, मोहनलाल खट्टर, कॅप्टन अभिमन्यू आणि ओ.पी. धनकड यांनीही मुख्यमंत्रिपद मिळण्याची आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. खट्टर हे रविवारी कर्नालमधून विजयी झाल्याबरोबर त्यांना चार सशस्त्र कमांडो देण्यात आले, हे विशेष.सुषमा स्वराज यांची बहीण वंदना यांचा भाजपाच्या बंडखोर उमेदवाराने पराभव केल्यामुळे स्वराज यांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. स्वच्छ प्रतिमेच्या, विकासशील नेत्याचीच या पदावर निवड करण्याविषयी मोदी आग्रही आहेत.
मुख्यमंत्री मोदी ठरवणार
By admin | Updated: October 20, 2014 06:00 IST