ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएमआणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील असे सांगितले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत.
नवी दिल्ली - लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने EVM हॅकिंगबाबत केलेल्या दाव्यांमुळे देशात खळबळ उडाली आहे. EVM हॅकिंगच्या वादानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच घेतल्या जातील असे सांगितले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात नेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरणे सुरुच ठेवणार आहोत. यासाठी राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्याचवेळी मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांमुळे घाबरणार नाही' असे सुनील अरोरा यांनी सांगितले आहे.
EVM हॅकिंग प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून, हॅकर सय्यद शुजाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरण्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सय्यद शुजा याने आपण भारतात वापरण्यात येणाऱ्या EVM बनवणाऱ्या टीमचा सदस्य असल्याचा आणि आपल्याला EVM हॅक करता येत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, असे निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने शुजा या हॅकरने केलेला दावा फेटाळून लावला होता. निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते.