पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. पाकिस्तानी सैनिकांनी कोणतेही कारण नसताना १०-१५ मिनिटं गोळीबार केल्याचेही या वृत्तांमध्ये म्हटले गेले. पण, हे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले असून, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
काही माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये पुंछमध्ये सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याचे म्हटले आहे. आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की, ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही, असे लष्कराकडून सांगण्यात आले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशात मे महिन्यात लष्करी संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतातील काही ठिकाणांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता.
दोन्ही देशात १० मे रोजी शस्त्रसंधी झाली. तेव्हापासून सीमेवर शांतता आहे. याच शस्त्रसंधीचे श्रेय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेताना दिसत आहेत.