By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 21:02 IST
10 वीच्या मंडळाच्या परीक्षेसाठी 9 वीमध्येच अर्ज करावा लागतो.
CBSE: बोर्ड परिक्षेच्या फीमध्ये भरमसाट वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अनुसूचित जाती(एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या 10वी, 12वीच्या परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. ही वाढी तब्बल 24 पटींनी करण्यात आल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. याशिवाय सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
10 वीच्या मंडळाच्या परीक्षेसाठी 9 वीमध्येच अर्ज करावा लागतो. तर 12 वी साठी 11 वीमध्ये असतानाचा परीक्षेचा अर्ज करावा लागतो. सीबीएसईने गेल्या आठवड्यात शुल्क वाढविल्याची नोटीस पाठविली आहे. सर्व शाळांमध्ये जुन्या फीनुसार अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या शाळांना फरकाची रक्कम त्वरीत वसूल करण्यास सांगण्यात आले आहे.
अनुसूचित जाती(एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) वर्गाच्या विद्यार्थ्यांना आधी 50 रुपये शुल्क होते. ते 24 पटींनी वाढवून 1200 रुपये करण्यात आले आहे. तर सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 750 रुपयांवरून 1500 रुपये करण्यात आले आहे.
याशिवाय 12 वी बोर्डाच्या परीक्षेला अतिरिक्त विषय घेतल्यास एससी/एसटीच्या विद्यार्थ्यांना 300 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. आधी यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. तर सामान्य विद्यार्थ्यांचे आधीचे 150 रुपये वाढवून 300 रुपये शुल्क करण्यात आले आहे. तर दृष्टीहीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आल्याचे सीबीएससीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अतिरिक्त शुल्क शेवटच्या मुदतीपर्यंत न भरल्यास त्यांना परिक्षेला मुकावे लागणार आहे.
याशिवाय मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी 350 रुपये भरावे लागणार आहेत. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क दहा हजार करण्यात आले आहे. आधी हे शुल्क 5 हजार रुपये होते. तर अतिरिक्त विषयासाठी य़ा विद्यार्थ्यांना 2000 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.