लोणी अर्बन मल्टी-स्टेट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी (LUCC) घोटाळ्याप्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट अभिनेते आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यासह इतर १३ जणांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. हे दोन्ही अभिनेते फर्मचे ब्रँड अॅम्बेसीडर होते, असे यात म्हटले आहे.
चिट फंड कंपनी LUCC घोटाळ्यासंदर्भातील खटल्यावर उत्तराखंड उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. उत्तराखंड राज्यातील नागरिकांचे अंदाजे ₹८०० कोटी रुपये घेऊन चिट फंड कंपनीचे संचालक फरार झाले आहेत. या प्रकरणाची CBI (केंद्रीय तपास ब्युरो) कडून चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उत्तराखंड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
तळपदेसह इतरांवर जो गुन्हा दाखल झाला आहे तो चिट फंडाच्या देहरादून कार्यालयाकडून फसलेल्या लोकांनी दाखल केला आहे. या चिटफंडाच्या कर्मचाऱ्यांनी विविध योजनांचे एजंट बनवून या लोकांकडून 6.27 कोटी रुपये घेतले आणि कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले. या घोटाळ्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत गेली होती. सोसायटी ही भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत एक संस्था आहे. तिचे ब्रँड अॅम्बेसेडर चित्रपट अभिनेते आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे आहेत.
मुख्य व्यवस्थापकीय संचालक समीर अग्रवाल (रा. घनसोली, नवी मुंबई), शबाब हुसेन रिझवी (रा. ओराई, जिल्हा जालौन), आरके शेट्टी (रा. दादर पश्चिम मुंबई), संजय मुडगिल (रा. सुनकाली, अमलेहाड, उना, हिमाचल प्रदेश), उत्तम कुमार सिंग आणि माया राजपूत (रा. चित्रगुप्त नगर, जिल्हा बाराबंकी) यांनी मिळून देहरादूनमध्ये सोसायटीला सरकारी संस्था म्हणून दाखवून आठ शाखा उघडल्या होत्या. आरोपींनी लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तक्रारदारांची दिशाभूल केली आणि त्यांना एजंट बनवून पैसे गोळा करण्याची जबाबदारी सोपवली. या लोकांनी सोसायटीच्या सुकन्या योजना, आयुष्मान योजना, पेन्शन योजना, एफडी, एआयपी, शिक्षण योजना इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ₹६.२७ कोटी गोळा केले होते. ते घेऊन ओरोपींनी पोबारा केला होता. या प्रकरणात या सोसायटीचे ब्रँड अॅम्बेसेडर चित्रपट अभिनेते आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांचीही नावे नोंदविण्यात आली आहेत.