आग्रा: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागलं असून पोलिसांवर हल्लेदेखील झाले आहेत. उत्तर प्रदेशात असे सर्वाधिक प्रकार घडले आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशात आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला. त्यावेळी एका पोलिसाचा जीव थोडक्यात वाचला. जॅकेटमध्ये असलेल्या पाकिटामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. फिरोजाबादमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विजेंद्र कुमार आणि त्यांचे सहकारी धर्मेंदर यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. धर्मेंदर यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विजेंद्र कुमार यांच्या दिशेनंदेखील गोळीबार झाला. बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली. मात्र विजेंद्र कुमार अतिशय सुदैवी ठरले. जमावाकडून झाडली गेलेली गोळी जॅकेटच्या वरील बाजूस असलेल्या खिशाला लागली. या खिशात विजेंद्र यांनी पाकिट ठेवलं होतं. जमावाकडून झाडलेली गोळी याच पाकिटात घुसली आणि विजेंद्र यांचा जीव वाचला.
CAA Protest: पोलीस हवालदाराच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये गोळी घुसली; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 08:43 IST