आपलं स्वत:चं एक घर असावं असं प्रत्येकाचे स्वप्न असते. नोकरीला लागल्यानंतर सर्वात आधी लोक घर खरेदी करण्याचा निर्णय घेतात. भारतात घर खरेदी करण्याच्या निर्णयाला भावनिक किनार आहे. सध्या घर खरेदी करणे सहज सोपे आहे. कारण घराच्या एकूण किंमतीतील मोठा हिस्सा बँकेकडून कर्ज म्हणून दिला जातो. लोक इथूनतिथून जमापुंजी वापरून डाऊन पेमेंट करतात. परंतु कर्जावर घर खरेदी करणे योग्य निर्णय आहे का?
आज आपण जाणून घेऊया की, कर्ज काढून घर खरेदी करणे फायदेशीर आहे की नाही. त्याचसोबत कर्ज काढून घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने राहणे परवडेल? जर आर्थिक बाबींचा विचार केला तर सामान्यत: लोक कर्ज काढून घर खरेदी करतात त्यानंतर आयुष्यभर EMI देत राहतात. त्यामुळे घर खरेदी करताना संपूर्णत: विचार करणे गरजेचे आहे.
आपल्या देशात बहुतांश लोक १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. विशेष मेट्रो शहरात राहणाऱ्या १ बीएचके फ्लॅटची किंमत ४० लाख रुपये आहे समजा, ज्यात १५ टक्के डाऊन पेमेंट म्हणजे ५ ते ६ लाख रुपये तुम्ही भरले. त्यानंतर स्टॅम्ट ड्युटी, रजिस्ट्रेशन शुल्क आणि दलाली वेगळी. इतकेच नाही तर नवीन घर खरेदी केल्यानंतर नवीन फर्निचर, डेकोरेशन सामान खरेदी केले जाते. ज्यावर किमान ३-४ लाख खर्च होतात. डाऊन पेमेंट आणि हे सर्व खर्च पाहिले तर घरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला १० लाखांपर्यंत खर्च करावा लागतो.
उदा - ४० लाखांचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी ५ लाख डाऊन पेमेंट करावे लागते. त्यानंतर ३५ लाख बँकेतून कर्ज दिले जाते. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर ८-९ टक्के व्याजाने कर्ज मिळते. ९ टक्के हिशोब पकडला तर २० वर्षांसाठी ३५ लाख होम लोनवर दर महिना ३१,९४० रुपये EMI भरावा लागतो. त्याशिवाय डाऊन पेमेंट आणि इतर गोष्टींसाठी १० लाखांपर्यंत खर्च करावे लागतात.
भाड्याने घर घेतले तर होईल फायदा? आता दुसऱ्या परिस्थितीत, जर तुम्ही फ्लॅट खरेदी न करता भाड्याने घेतला तर तो साधारणपणे १५ हजार महिना भाड्यावर मिळू शकतो. त्यामुळे दर महिन्याला तुमच्या सेव्हिंगमध्ये १६ हजार रुपयांहून अधिक बचत होईल. जर तुम्ही हे पैसे योग्यरित्या गुंतवणूक केले तर कोट्यवधीचा फंड तयार होऊ शकतो. चांगले रिटर्न मिळवण्यासाठी सध्या विविध गुंतवणुकीचे पर्याय आहेत.
SIP मधून जबरदस्त रिटर्न्सकमी प्रयत्नात जास्त रिटर्न देण्याच्या दृष्टीने एसआयपी(SIP) हे एक चांगले साधन मानले जाते. SIP साठी १० ते १२ टक्के परतावा सामान्य आहे. तुम्ही १२% रिटर्नसह एसआयपीमध्ये २० वर्षांसाठी दरमहा १६००० रुपये गुंतवल्यास, तुम्हाला २० वर्षांनंतर सुमारे १.६० कोटी रुपये मिळतील. २० वर्षात तुम्ही सुमारे ३८ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. SIP च्या बाबतीत, १५% परतावा ही मोठी गोष्ट नाही. जर तुम्ही अशा SIP मध्ये पैसे गुंतवले तर २० वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे २.४२ कोटी रुपयांचा फंड तयार होईल.
याशिवाय प्रत्येक महिन्याच्या EMI व्यतिरिक्त, तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी १० लाख रुपयांची एकरकमी रक्कम देखील आहे, जी तुम्ही डाउन पेमेंट आणि इतर गोष्टींसाठी खिशातून खर्च करणार आहात. ही १० लाख रुपयांची एकरकमी कुठेतरी गुंतवली तर २० वर्षांनी तीही मोठी रक्कम होईल. ही गुंतवणूक २० वर्षांत १२ टक्के वार्षिक दराने सुमारे ९७ लाख रुपये आणि १५ टक्के दराने १.६४ कोटी रुपये होईल.दुसरीकडे, जर तुम्ही घर विकत घेतले तर तुम्हाला कर्जमुक्त होण्यासाठी २० वर्षे लागतील. भारतातील रिअल इस्टेटचा दर वार्षिक ६-८ टक्के दराने वाढत आहे. या आधारावर तुम्हाला जे घर आता ४० लाख रुपयांना मिळत आहे, ते तुम्हाला २० वर्षांनंतर १.२० कोटी रुपयांमध्ये मिळेल. म्हणजेच आज जो फ्लॅट गृहकर्ज घेऊन ४० लाख रुपयांना विकत घेतला जाईल, त्याची किंमत २० वर्षांनंतर एका अंदाजानुसार १.२० कोटी रुपये असेल. परंतु त्याच वेळी जुन्या घराचे मूल्य नेहमीच कमी होते.