नवी दिल्लीः दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, 35 प्रवासी जखमी आहेत. जखमींना सेफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमधून 90 जण प्रवास करत होते. खासगी बस जेव्हा एक्स्प्रेस वेवर भदाव गावाजवळ पोहोचली, तेव्हा चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस अनियंत्रित झाल्यानं पुढच्या ट्रकवर जाऊन धडकली. त्यानंतर मोठा आवाज झाला. तात्काळ स्थानिकांनी बचावकार्य सुरू केलं आणि पोलिसांना या अपघाताची सूचना दिली. अपघात झालेल्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून, एडीजी झोनचे अजय आनंद आणि आयजी रेंजचे ए. सतीश गणेश घटनास्थळाची पाहणी करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवता आलेली नाही. अपघातामुळे बसचा पुढचा भागाचा पत्रा तुटला आहे. घटनास्थळी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं आहे.
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 07:46 IST