कर्णकर्कश हॉर्नवर पोलिसांनी चालविला बुलडोझर (फोटो)
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
ग्रामीण वाहतूक शाखेची कारवाई
कर्णकर्कश हॉर्नवर पोलिसांनी चालविला बुलडोझर (फोटो)
ग्रामीण वाहतूक शाखेची कारवाईऔरंगाबाद : ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने महिनाभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत हजारो वाहनांना नियमबाह्यपणे लावण्यात आलेले कर्णकर्कश हॉर्न जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या हॉर्नवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज १४ फेब्रुवारी रोजी बुलडोझर फिरविला.परिवहन विभागाने प्रत्येक वाहनांच्या हॉर्नची क्षमता ठरवून दिलेली आहे. मात्र, बाजारात मिळणारे जास्त क्षमतेचे हॉर्न बसवून वाहनचालक सर्रास मिरवीत असतात. कानाचे पडदे फाडणारे हे हॉर्न बसविल्यास वाहनचालकास दंड करण्याची तरतूद आहे. औरंगाबाद ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या वतीने नववर्षाच्या दुसर्या आठवड्यापासून कर्णकर्कश हॉर्नविरोधात विशेष मोहीम उघडली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईअंतर्गत कार, जीप, मोटारसायकलींसह सुमारे दोन हजार वाहनांना लावण्यात आलेले इलेक्ट्रिक प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले होते. वाहनचालकांकडून १ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रेशर हॉर्न वाजविल्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. ही बाब लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव कुटे, सहायक उपनिरीक्षक शेलार, भाऊसाहेब जमधडे, जमादार गजानन लहासे, विनोद हजारी, संदीप दुबे, राहुल थोरात, गणेश जाधव यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेले हॉर्न शनिवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारील गोकुळ स्टेडियम येथे आणून त्यांच्यावर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले. त्यामुळे या हॉर्नचा पुन्हा कोणीही उपयोग करू शकणार नाही.