‘त्या’ दोघांनी दारू पिऊन तरुणीचा केला पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:35 AM2017-08-12T01:35:56+5:302017-08-12T01:36:33+5:30
रात्री उशिरा घरी परतणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याच्या तरुण मुलीची छेडछाड करून तिचे अपहरण करू पाहणाऱ्या विकास बराला आणि त्याच्या मित्राने पाठलाग करण्यापूर्वी दारू विकत घेतली होती. तसे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
चंदीगड : रात्री उशिरा घरी परतणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याच्या तरुण मुलीची छेडछाड करून तिचे अपहरण करू पाहणाऱ्या विकास बराला आणि त्याच्या मित्राने पाठलाग करण्यापूर्वी दारू विकत घेतली होती. तसे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. विकास बराला हा हरयाणा भाजपाचे अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा आहे.
विकास बराला आणि त्याचा मित्र आशिष कुमार यांना अटक करण्यात आली असून, ते पोलीस कोठडीत आहेत. याशिवाय विकास आणि त्याचा मित्र कारमधून त्या तरुणीचा पाठलाग करीत असल्याचेही सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झाले आहे. त्या रात्री
पोलिसांनी विकास व आशिष कुमार यांना अटक केली होती आणि त्या वेळी ते दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले होते.
राजकीय दबावाचा आरोप
हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप झाला होता. मात्र भाजपा नेतृत्वाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली. तसेच सुभाष बराला यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, ही मागणी भाजपामधूनच सुरू झाली. त्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्धची कारवाई जोरात सुरू केली.