जयंतीनगरीसमोरील खूनप्रकरण
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
आठ आरोपींची निर्दोष सुटका
जयंतीनगरीसमोरील खूनप्रकरण
आठ आरोपींची निर्दोष सुटकाजयंतीनगरीसमोरील खूनप्रकरणनागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलतरोडी जयंतीनगरीसमोरील खूनप्रकरणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आठ आरोपींची निर्दोष सुटका केली. भंगारवाला आशिष नारायण मस्के रा. रामेश्वरी, वामन संतोष भुराडे, मयूर चंदू बोरकर, अमोल सुरेश मेहर, लल्ला ऊर्फ रजत किशोर शर्मा, कॅफ ऊर्फ शुभम मधुकर मेश्राम, कार्तिक अशोक शर्मा आणि जित्या ऊर्फ जितेंद्र हिरामण हिवरकर सर्व रा. हावरापेठ अशी आरोपींची नावे आहेत. एक आरोपी रोशन सुरेश गुप्ता रा. चंद्रनगर हा अद्यापही फरार आहे. गोल्या ऊर्फ गौरव दिलीप कोंडेवार (२२) रा. चंद्रनगर, असे मृताचे नाव होते. सरकार पक्षानुसार आरोपींनी २ नोव्हेंबर २०१३ रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास मोटरसायकलींवर येऊन जयंतीनगरीसमोरील मैदानात सशस्त्र हल्ला करून गौरवचा खून केला होता. खुनाच्या घटनेच्यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी गौरव याने हावरापेठ पुलावर डोमा ऊर्फ रोशन आणि गुजैया या दोन सख्ख्या भावांमधील भांडण सोडवले होते. त्याने डोमाच्या हातातील कुऱ्हाड हिसकावली होती. त्यामुळे डोमा चिडला होता. डोमाने लागलीच फोन करून १०-१५ जणांना बोलावून घेतले होते. त्यापैकी काहींनी गौरवच्या कंबरेवर चाकुने वार करून जखमी केले होते. गौरवच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी डोमा आणि आशू भंगारवाला यांना अटक केली होती. १ नोव्हेंबर रोजी ते जामिनावर सुटून आले होते. दुसऱ्या दिवशीच त्यांनी गौरवचा खून केला होता. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. पी. जयस्वाल यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात आरोपींच्यावतीने ॲड. प्रफुल्ल मोहगावकर आणि ॲड. पराग उके यांनी काम पाहिले.