Lieutenant Vinay Narwal: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले करनालचे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची पत्नी हिमांशी नरवाल या घटनेनंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर आल्या आहेत. हिमांशी नरवाल यांच्या कुटुंबाने विनय यांना श्रद्धांजली वाहून रक्तदान केले. यावेळी हिमांशी नरवाल यांचे अश्रु थांबण्याचे नाव घेत नव्हते. मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं हिमांशी नरवाल यांनी यावेळी म्हटलं.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले होते. आज १ मे रोजी विनय नरवाल यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाने करनालमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्या कुटुंबाने विनय यांना शहीद दर्जा देण्याची मागणी केली आहे. विनयचे नातेवाईक, आई आशा, वडील राजेश नरवाल आणि आजोबा हवा सिंह यांनीही त्याला शहीद दर्जा देण्याची मागणी एकमताने पुन्हा केली आहे.
विनय नरवाल याची पत्नी हिमांशीने यावेळी एक मोठे विधान केले आहे. या संपूर्ण घटनेनंतर सुरु असेल्या हिंदू, मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्यांवर हिमांशीने आक्षेप घेतला आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत की तो (विनय) कुठेही असला तरी त्याला शांती मिळो. आम्हाला फक्त शांतता हवी आहे, असे हिमांशीने म्हटलं.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू-मुस्लिमच्या नावाने विधान करणाऱ्यांना हिमांशीने चोख उत्तर दिले. "आम्हाला हिंदू-मुस्लिमच्या नावाखाली द्वेष पसरवायचा नाही. आम्हाला लोक मुस्लिम आणि काश्मिरींच्या विरोधात जावेत असं अजिबात वाटत नाही. आम्हाला हे नको आहे. आम्ही फक्त आणि फक्त सर्वांना शांततेचे आवाहन करतो," असेही हिमांशीने सांगितले.
यावेळी हिमांशी म्हणाली की आम्हाला फक्त न्याय हवा आहे. ज्यांनी विनयसोबत अन्याय केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कुटुंबातील सर्व सदस्य रक्तदान करणार आहेत. यावेळी पत्रकारांनी हिमांशीला तीही देशसेवेचा मार्ग निवडणार आहे का, तेव्हा तिने होकारार्थी उत्तर दिले. दुसरीकडे विनयची बहीण सृष्टीनेही लोकांना रक्तदानासाठी येण्याचे आवाहन केले.