नवी दिल्ली : काळ्या पैशासंदर्भातील काही प्रकरणांच्या तपासाला गती देण्याच्या उद्देशाने विदेशातील काही भारतीय मोहिमांमध्ये आपले काही अधिकारी नियुक्त करण्याची मागणी सीबीआयने केली आहे़सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी आज रविवारी मोनाकोला रवाना होण्यापूर्वी ही माहिती दिली़ आम्ही यासंदर्भात विशेष तपास दलास(एसआयटी) एक नोट सादर केली आहे, असे त्यांनी सांगितले़ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गत महिन्यात काळ्या पैशासंदर्भात सरकारने न्या़(सेवानिवृत्त) एम़बी़ शहा यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीचे गठन केले होते़ काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईत आवश्यक संस्थात्मक संरचना निर्माण करण्यासह सर्वसमावेशक कृती योजना तयार करण्यास एसआयटीला सांगण्यात आले आहे़ या कृती योजनेंतर्गत एसआयटीने विदेशातील काळ्या पैशासंदर्भातील प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी विविध तपास संस्थांकडून त्यांची मते मागितली आहेत़़ या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका इत्यादी देशांतील भारतीय मोहिमांवर सीबीआय अधिकारी नियुक्त करण्यात यावे, असे सीबीआय संचालकांचे मत आहे़ विशेषत: लेटर्स रोगटरी(विदेशी सरकारकडून तपासात सहकार्य मिळावे, यासाठीचे विनंतीपत्र) नाकारण्यात आलेल्या देशांतील भारतीय मोहिमांवर सीबीआय अधिकाऱ्यांची तैनाती गरजेची असल्याचे सीबीआय संचालकांना वाटते़ या देशांतील मोहिमा मदतगार आहेत़
काळा पैसा : सीबीआयला हवे आपले अधिकारी
By admin | Updated: November 3, 2014 02:54 IST