भाजपाचा मांझी यांना पाठिंबा
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप जारी
भाजपाचा मांझी यांना पाठिंबा
सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप जारीपाटणा : बिहार विधानसभेत उद्या शुक्रवारी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्याच बाजूने मतदान करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. भाजपाने मांझी यांच्या सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. मांझी सरकारच्या बाजूनेच मतदान करण्यासाठी भाजपाने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.भाजपा मांझी सरकारमध्ये सामील होणार नाही किंवा स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नही करणार नाही, असे मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मांझी यांना पाठिंबा देण्याचा हा निर्णय घेण्यात आला. नितीशकुमार यांनी एका महादलिताचा अवमान केला आहे आणि या अवमानाचा बदला म्हणून आम्ही मांझी यांच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदी म्हणाले. केवळ गुप्त मतदानानेच बिहारच्या गरीब जनतेला न्याय मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.विधानसभेत भाजपाचे ८७ आमदार आहेत. तर जदयूचे १११, राजदचे २४, काँग्रेसचे ५,भाकपाचा एक आणि ५ अपक्ष आमदार आहेत. दहा जागा रिक्त आहेत. त्यामुळे मांझी यांना विधानसभेत बहुमतासाठी ११७ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. (वृत्तसंस्था)