हरीश गुप्ता, नवी दिल्लीनवे मंत्री सुरेश प्रभू शिवसेनेचे की भाजपाचे हा मुद्दा मध्यरात्रीच्या नाट्यानंतर संपुष्टात आला आहे. भाजपाचे सरचिटणीस जे.पी. नड्डा यांना प्रभू यांना पक्षाचे सर्वसाधारण सदस्यत्व देण्यासाठी मध्यरात्रीला कार्यालय उघडावे लागले. त्यातून सुरेश प्रभूंचे महत्त्व अधोरेखित झाले.आम्हाला सुरेश प्रभू यांच्याशी काहीही देणेघेणे नाही, असे सांगत शिवसेनेने राष्ट्रपतीभवनातील शपथविधीवर बहिष्कार टाकल्याने भाजपला प्रभूंना सामावून घ्यावे लागले. गेल्या ६-७ वर्षांत प्रभू यांनी शिवसेनेच्या एखाद्याच कार्यक्रमात हजेरी लावली असेल तर तो अपवाद ठरावा. वाजपेयी सरकारच्या काळात प्रभू हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री बनले आणि त्यांनी ऊर्जामंत्री म्हणून ठसा उमटवला. त्यानंतर त्यांची उंची वाढत गेली. वाजपेयींनी नंतर त्यांना आंतरनदी जोडणी कृतिदलाचे अध्यक्षपद दिले. २००४ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले मात्र रालोआने सत्ता गमावली. प्रभूंनी त्यानंतर केवळ भाजपाशीच संबंध जोडले नाही तर ते रा.स्व.संघाच्या थिंक टँकमध्ये सहभागी झाले. सध्या भाजपाचे सरचिटणीस असलेले आणि एकेकाळी संघाचे प्रवक्ते राहिलेले राम माधव यांच्याशी त्यांचा संबंध आला. मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला जाण्यास नकार दिला असता तर राम माधव यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठविण्यात आले असते.माधव यांनी इंडिया फाऊंडेशन ट्रस्टची स्थापना केली आणि प्रभू यांनाही त्यात स्थान मिळाले. विवेकानंद फाऊंडेशनमधील अजित डोवाल, नृपेंद्र मिश्रा, आर.पी. मिश्रा आणि इतरांनी पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाचे पद मिळविले आहे. इंडिया फाऊंडेशनशी संबंध असलेले सर्व जण मोदींच्या लोकसभा मिशन २७२ च्या चमूचे सदस्य आहेत, हे उल्लेखनीय.मोदी सत्तेवर आल्यानंतरही राम माधव, सुरेश प्रभू आणि अजित डोवाल यांचे पुत्र श्रेय डोवाल यांनी फाऊंडेशनचे काम सुरूच ठेवत चीन, आॅस्ट्रेलिया, अमेरिका या देशांना भेटी दिल्या. त्यानंतर मोदींनी या देशांच्या संबंधांची पायाभरणी चालविली आहे. मोदींचे विदेश दौरे यशस्वी करण्यात या चमूचा सहभाग होता. मोदींना योजना आयोगाची पुनर्रचना आणि गंगा कृती योजना हा आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणायचा असून त्यात प्रभू विधायक भूमिका बजावतील. प्रभू हे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.
भाजपाने जाणले प्रभूंचे महत्त्व
By admin | Updated: November 10, 2014 03:41 IST