जम्मू : जम्मू-काश्मिरात सत्ता कुणाची हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित असला तरी भाजपाने या दिशेने चाचपणी सुरू केली आहे़ नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, पक्षनेते अरुण जेटली आदींशी चर्चा केल्याचे वृत्त मीडियाने दिल्याने राज्यात भाजपा-एनसीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे़ खुद्द भाजपाने या वृत्ताचे खंडन केले असून ओमर यांनी यावर थेट बोलण्यास नकार दिला आहे़दुसरीकडे भाजपाच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना खीळ घालण्याची काँग्रेसची योजना आहे़ मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) जनादेशाचा आदर करीत नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असा अनाहूत सल्ला काँग्रेसने दिला आहे़जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त २८ जागा जिंकणाऱ्या पीडीपीला बहुमतासाठी अन्य पक्षाची मदत घेणे अपरिहार्य आहे. शिवाय २५ जागा मिळालेली भाजपाही सर्व पर्यायांचा अवलंब करीत सरकार स्थापण्याचा दावा करण्याच्या मन:स्थितीत आहे; मात्र यापैकी भाजपाच्या सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांनी वेग घेतला आहे़ (वृत्तसंस्था)
जम्मू-काश्मिरात भाजपाची सत्ता?
By admin | Updated: December 26, 2014 01:36 IST