रघुनाथ पांडे, नवी दिल्लीराज्यातील भाजपाच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या सात, रेसकोर्स या बंगल्यावर बोलाविले आहे. रात्रीपर्यंत सर्व खासदारांना निरोप पोहोचविले जातील. ‘वन-टू-वन’ बैठक पंतप्रधान घेणार असल्याने खासदारांना तयारी करावी लागणार आहे.मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या बैठकीत केंद्रातील राज्याशी संबंधित मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले. तथापि, त्यांच्याबाबतचा निर्णय पंतप्रधान नेपाळहून परतल्यावर घेतला जाईल.सूत्रांनी सांगितले, पंतप्रधान मोदी प्रत्येक राज्यातील भाजपाच्या खासदारांना भेटत आहेत. त्याच मालिकेतील ही भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी, महाराष्ट्रातील निवडणूक लक्षात घेऊन पंतप्रधानांनी खासदारांना कळीचे मुद्दे, प्रलंबित प्रश्न घेऊन बोलविले आहे. विशेष म्हणजे सरकार आल्यावर कोणी किती विषय मांडले, मंत्र्यांनी कसा प्रतिसाद दिला, किती पाठपुरावा करण्यात आला, राज्य सरकारचा समन्वय आहे का, असे बारकावेही चर्चेत येणार आहेत.निवडणुकीच्या पुढ्यात कोणत्या मुद्यांना आपण हायलाईट केले पाहिजे, तेसुध्दा याच बैठकीतून ठरणार असल्याचे सांगण्यात आले. सूरजकुंड येथे मागील महिन्यात झालेल्या नव्या खासदारांच्या प्रशिक्षण वर्गात मोदींनी अशी बैठक घेण्यात येईल असे सांगितले होते.
राज्यातील भाजपा खासदारांची उद्या पंतप्रधानांसोबत बैठक
By admin | Updated: August 4, 2014 02:41 IST