अहमदाबाद : भाजपाचे खासदार राजेश चुडासामा हे गणेश उत्सव कार्यक्रमात नाचणाऱ्या लोकांवर नोटा उडवीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुजरातच्या जुनागड जिल्ह्यात शनिवारी ही घटना घडली. ही एक परंपराच आहे, असे सांगून भाजपा नेत्यांनी चुडासामा यांचा बचाव केला आहे.या व्हिडिओत जुनागडचे खासदार चुडासामा आणि भाजपाचे अन्य काही नेते शनिवारी रात्री गणेश पूजा कार्यक्रमात नाचणाऱ्या लोकांवर रुपयांच्या नोटा उडवीत असल्याचे दिसते. नोटा उडविणाऱ्यांमध्ये कृषी राज्यमंत्री जश बराद यांचे पुत्र दिलीप बराद आणि कोडिनार नगरपालिकेचे अध्यक्ष शिव सोळंकी यांचाही समावेश आहे. सोळंकी हे आरटीआय कार्यकर्ता अमित जेठवा हत्याकांडातील आरोपी आहेत.ही एक परंपरा आहे आणि या पैशाचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला जाईल, असे खा. चुडासामा यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
गुजरातच्या भाजपा खासदाराने गणेश विसर्जन कार्यक्रमात उडविल्या नोटा
By admin | Updated: September 28, 2015 01:59 IST