ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ६ - बिहारमधील सत्ताधारी जनता दल मधील(संयुक्त) अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आला असून मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी बंडाचे संकेत दिले आहे. जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीत जाण्यास मांझी यांनी नकार दिला आहे. मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यास मांझी विधानसभाच बरखास्त करतील अशी चर्चा असल्याने बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
लोकसभा निवडणुकीत बिहारमधील निराशाजनक कामगिरीनंतर जदयू नेते नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितनराम मांझी यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती. मात्र मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच मांझी यांनी बेताल वक्तव्य करत पक्षाचीच कोंडी केली. अखेरीस नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय जदयूच्या नेत्यांनी घेतला आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह आणि राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांनीदेखील नितीशकुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी शनिवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली होती. मांझी यांना २३ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या विधीमंडळ समितीच्या बैठकीत राजीनामा द्यायला लावायचा अशी योजना जदयू नेतृत्वाने आखली होती. मात्र मांझी यांना हा निर्णय फारसा भावलेला दिसत नाही. मांझी यांनी शरद यादव यांच्या बैठकीला जाण्यास नकार दिला असून २० फेब्रुवारी रोजी त्यांनी स्वतः आमदारांची बैठक बोलवली आहे. मी स्वतः विधीमंडळ समितीचे नेते असून अन्य नेत्यांनी आमदारांची बैठक बोलवणे अवैध आहे असा दावा मांझी यांनी केला. मांझी यांना जदयूतील २५ आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लावणे जदयूसाठी कठीण झाले आहे. आता या पक्षांतर्गत बंडावर नितीशकुमार काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.