बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. नितीश कुमार सरकारने ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक विकास आणि सक्षमीकरणासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. समाज कल्याण विभागाने 'बिहार राज्य किन्नर कल्याण मंडळ' स्थापनेसाठी अधिसूचना जारी केली आहे.
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे समाज कल्याण मंत्री मदन साहनी यांना या २८ सदस्यीय समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या सचिव बंदना प्रेयशी म्हणाल्या की, ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांच्या सामाजिक विकास आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने बिहार राज्य किन्नर कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे, या मंडळाचे सात सदस्य हे ट्रान्सजेंडर समुदायाचे आहेत, अशीही त्यांनी माहिती दिली.
बंदना प्रेयशी पुढे म्हणाल्या की, "ट्रान्सजेंडर समुदायाच्या सामाजिक विकासाशी संबंधित उपाययोजना राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर मंडळ लक्ष ठेवेल. ट्रान्सजेंडर समुदायाला नियमित रोजगारासाठी तयार करण्याच्या उद्देशाने त्यांना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. ट्रान्सजेंडर समुदायाला सुरक्षित आणि देशातील इतर नागरिकांप्रमाणे सन्माननीय जीवन जगण्याचा अधिकार मिळावा, असा सरकार प्रयत्न करत आहे."