बिहारमधील गोपाळगंजमध्ये टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरहिमा गावातील गरिमा पांडे या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या तेव्हा तिचे कुटुंबीय तिला खासगी वाहनातून रुग्णालयात घेऊन जात होते.
टोल प्लाझावर खूप ट्रॅफिक असल्याने त्यांना तासन्तास वाट पहावी लागली. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि नवजात बाळाचा पोटातच मृत्यू झाला. प्रसूती वेदना होत असलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी टोल प्लाझाच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांकडे मदतीसाठी विनंती केली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळेच रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला.
महिलेचे नातेवाईक सोनू पांडे यांनी टोल प्लाझा व्यवस्थापक राजीव कुमार शर्मा, कृष्ण मोहन मिश्रा आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध सिधवालिया पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये संताप आहे.
हा टोल प्लाझा गेल्या महिन्यातच NH-२७ वर सुरू झाला होता, त्यानंतर येथे सतत वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांब रांगा लागतात आणि लोक तासन्तास रस्त्यावर अडकून पडतात. ही घटना ४ जानेवारी रोजी घडली. यामध्ये, सोनू पांडे यांनी एफआयआर दाखल केला आहे की, त्यांच्या भावाच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर गोपाळगंजला नेले जात होते. ट्रॅफिक असल्याने टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात आली, ज्यामुळे वाद झाला आणि उशीर झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.