Operation Mahadev: श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सोमवारी (२८ जुलै ) श्रीनगरच्या लिडवास भागात, सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत एक मोठी कारवाई केली. या कारवाईत सैन्याला मोठे यश आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड मुसा याच्यासह अन्य दोन टीआरएफच्या दहशतवाद्यांना ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. हे दहशतवादी सापडले तेव्हा सुरक्षा दल आधीच परिसरात शोध मोहीम राबवत होते.
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
लिडवास हा श्रीनगरच्या बाहेरील भागात घनदाट जंगलाचा परिसर आहे. हा डोंगराळ मार्गाने त्रालला जोडतो. या भागात यापूर्वीही टीआरएफच्या दहशतवादी कारवायांच्या बातम्या आल्या आहेत. ही कारवाई लष्कराच्या चिनार कॉर्प्सकडून सुरू आहे. यामध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, दाचिगम जंगलाच्या वरच्या भागात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची संयुक्त कारवाई अजूनही सुरू आहे. हा तोच परिसर आहे जिथे जानेवारीमध्ये टीआरएफचा एक लपण्याचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला होता. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या.
जंगलात अजूनही दहशतवादी लपल्याचा संशय
सोमवारी दाचिगाममध्ये शोध मोहिमेदरम्यान अचानक गोळीबार झाला, यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि कारवाई तीव्र केली. या परिसरात आणखी टीआरएफ दहशतवादी अजूनही जंगलात लपल्याचा संशय लष्करांना आहे.
दाछिगाम जंगल हे आधीच टीआरएफ च्या दहशतवाद्यांचे मुख्य लपण्याचे ठिकाण मानले जाते. नियंत्रण रेषेजवळ अलिकडेच झालेल्या भूसुरुंग स्फोटाची जबाबदारीही याच गटाने घेतली होती, यामध्ये एक सैनिक शहीद झाला होता आणि तीन जखमी झाले होते. स्थानिक प्रशासनाने लोकांना त्यांच्या घरात राहण्याचे आणि ऑपरेशनमुळे परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. परिसरात सुरक्षा दलांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि ऑपरेशन अजूनही सुरू आहे.