ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ८- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू - राजदच्या महाआघाडीने विजयाचा बार उडवत भाजपाचा धूव्वा उडवला आहे. बिहारमधील २४३ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात राजद, जदयू व काँग्रेस महाआघाडीला १७८ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपा प्रणित रालोआला ५८ जागांवर समाधान मानावे लागले, त्यामध्ये भाजपा ५३, लोकजनशक्ती पार्टी - २,राष्ट्रील लोकसमाज पक्ष - २, हिंदूस्तान आवाम मोर्चा - १ जागांवर विजयी झाले आहेत.
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झाले असून सुमारे ५७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. रविवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात भाजपाने आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर भाजपाची पिछेहाट सुरु झाली व जदयूप्रणित महाआघाडीने जोरदार मुसंडी मारली.दुपारनंतर बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता येणार हे स्पष्ट होताच जदयू, राजद व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला.
बिहारमधील निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यातील थेट लढत मानली जात होती. मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआ आणि महाआघाडीत सत्तेसाठी अटीतटीची झुंज होणार असल्याचे भाकीत वर्तविले होते. मात्र हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत महाआघाडीने एकहाती सत्ता काबीज केली.
महाआघाडी
जदयू - ७१ जागांवर विजयी
राजद - ८० जागांवर विजयी
काँग्रेस - २७ जागांवर विजयी
एकूण - १७८ जागांवर विजयी
भाजपाप्रणित रालोआ
भाजपा - ५३ जागांवर विजयी
लोकजनशक्ती पार्टी - २ जागांवर विजयी
राष्ट्रील लोकसमाज पक्ष - २ जागांवर विजयी
हिंदूस्तान आवाम मोर्चा - १ जागांवर विजयी
एकूण - ५८ जागांवर विजयी
इतर ७ जागांवर विजयी झाले आहेत.