बंगळुरू - चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक लोक जखमी झालेत. या संपूर्ण घटनेचा १५ दिवसांत मॅजिस्ट्रेट तपास करण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धाराम्मैया यांनी दिलेत. इतक्या मोठ्या संख्येने चाहते जमा होतील याची कुणी कल्पना केली नव्हती. स्टेडियमची क्षमता ३५ हजार लोकांची होती परंतु या कार्यक्रमासाठी २-३ लाख लोक आले होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगत मृतांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरम्मैया म्हणाले की, मी आणि माझे सरकार या घटनेचे राजकारण करत नाही. या प्रकाराबाबत १५ दिवसांत मॅजिस्ट्रेट चौकशी करण्यात येईल. इतक्या मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. विजयी सोहळ्यावेळी ही दुर्घटना घडली. सरकार या घटनेतील जखमींवर मोफत उपचार करेल. मृतांच्या वारसांना १० लाख रुपये दिले जातील. या दुर्घटनेमुळे विजयाचा आनंद हिरावून घेतला आहे. घटनेतील जखमी लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो असं त्यांनी सांगितले.
तर बंगळुरूतील या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केले. बंगळुरू स्टेडियमबाहेर लाखोंच्या संख्येने आरसीबी फॅन जमले होते. विराट कोहलीसह टीमची एक झलक पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी होती. या गर्दीला नियंत्रित करण्यात पोलिसांना अपयश आले. त्यात एका नाल्यावरील स्लॅब कोसळला आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला. पोलिसांनी काही प्रमाणात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याचेही दिसून आले. मात्र या गर्दीत काहीजण खाली पडले. त्यांच्या अंगावरून लोक जात होते. त्यामुळे जवळपास ११ लोक यात दगावले.
दरम्यान, या दुर्घटनेत अनेक जण जखमी झालेत. स्टेडियम खचाखच भरले होते. त्यामुळे आम्ही परत जात होतो परंतु आम्हाला मागे जाण्याची परवानगी दिली नाही. गेटवर लोकांची प्रचंड गर्दी झाली. जरी पोलिसांनी गेट उघडला असता तरीही मोठ्या संख्येमुळे चेंगराचेंगरी झाली असती असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात तब्बल १८ वर्षांनी आरसीबी विजयी झाली. पंजाब टीमला हरवून बंगळुरूच्या टीमने आयपीएल चॅम्पियन खिताब पटकावला.