नवी दिल्ली : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या दादरी येथे घडलेले हत्याकांड हा निव्वळ एक अपघात असून, त्याला सांप्रदायिक रंग दिला जाऊ नये, अशी मुक्ताफळे उधळून केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे, तर या घटनेवरून भाजप आणि राज्यातील सत्ताधारी समाजवादी पार्टीत आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.दुसरीकडे केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला दादरी घटनेचा सविस्तर अहवाल मागितला असून, भविष्यात पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना केली आहे. पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा बंदोबस्तानंतरही असुरक्षिततेच्या भावनेने गोमांस खाल्ल्याच्या अफवेनंतर बळी ठरलेल्या मृत इकलाखचे भयभीत कुटुंबीय गाव सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.शर्मा यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या घटनेला धार्मिक रंग देण्याऐवजी एक अपघात समजून याकडे बघितले जावे. गैरसमजातून ही घटना घडली असून, याला जबाबदार लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गोमांस अफवेचा बळी केवळ एक अपघात
By admin | Updated: October 1, 2015 22:30 IST