आधी राजीनामा, मगच चर्चा : विरोधक अडलेनवी दिल्ली : ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि व्यापमं घोटाळ्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी लावून धरली; पण कोणीही राजीनामा देणार नाही, या भूमिकेवर सरकार अडून राहिले. परिणामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात मंगळवारी प्रचंड गदारोळात झाली. आधी राजीनामा, मगच चर्चा ही विरोधकांची मागणी सरकारने फेटाळून लावल्याने दिवसभर बरसलेल्या गोंधळात कामकाज वाहून गेले.सरकारने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळताना या मुद्द्यावर चर्चेची तयारी दर्शविली. पण राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक अडून बसले. आम्ही समर्पणाच्या भावनेतून देशासाठी काम करीत राहू तुम्ही अडथळे आणत राहा. तुम्हाला चर्चा करायची असल्यास आमची तयारी आहे, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.बुधवारी मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्यावर काँग्रेस लोकसभेत स्थगनप्रस्ताव मांडणार असल्याचे संकेत मिळाले असून, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी संसद भवन परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे देण्याची चिन्हे आहेत. लोकसभेत कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनाकडे जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सपा नेते मुलायमसिंह यादव यांच्यासह इतर नेत्यांना अभिवादन केले. या वेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ बरसला
By admin | Updated: July 22, 2015 01:50 IST