अयोध्येत बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुपारी १२.३० च्या सुमारास हा सोहळा संपन्न होणार आहे. या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी रामललांच्या तीन मूर्ती तयार करण्यात येत आहेत. यापैकी एका सर्वोत्तम मूर्तीची मंदिरात स्थापना होणार आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रस्टची एक समिती तयार करण्यात येत असलेल्या तीन मूर्तींपैकी कुठल्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना करण्यात येईल हे पुढच्या आठवड्यात निश्चित करणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची धार्मिक समिती १५ डिसेंबर रोजी मूर्तीला अंतिम रूप देणार आहे.
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, कर्नाटक आणि राजस्थानमधून आणलेल्या दोन शिळांमधून तीन मूर्ती बनवण्यात येत आहेत. या मूर्तींचं ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. या तीन मूर्तींपैकी सर्वश्रेष्ठ मूर्तीची निवड १५ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. ही मूर्ती मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केली जाणार आहे. या मूर्ती गणेश भट्ट, अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे तयार करत आहेत.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी २२ जानेवारी २०२४ हीच तारीख का निश्चित करण्यात आली, याबाबतही चर्चा सुरू आहे. या प्रश्नाचं उत्तर पंडित लक्ष्मीकांत दीक्षित आणि त्यांचे पुत्र पंडित सुनील दीक्षित यांन दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी मृगशिरा नक्षत्राचा दिवस निवडण्यात आला आहे.