ऑटो
By admin | Updated: January 22, 2015 00:06 IST
प्रदूषणमुक्त ऑटोची वयोमर्यादा २० वर्षे करणार
ऑटो
प्रदूषणमुक्त ऑटोची वयोमर्यादा २० वर्षे करणारऑटोचालकांना दिलासा : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा निर्णयनागपूर : प्रदूषणमुक्त नागपूर करण्याच्या दृष्टीने जे ऑटोचालक पुढाकार घेतील तसेच इलेक्ट्रॉनिक मीटरने चालतील त्यांच्या ऑटोची वयोमर्यादा २० वर्षे करण्यात येणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ऑटोचालक संघटनेच्यावतीने चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या. ज्या ऑटोला १६ वर्षे पूर्ण झाली आहे, त्याच्या परवान्याचे नूतनीकरण करून ही वयोमर्यादा २० वर्षांपर्यंत वाढविण्यात यावी. तसेच तांत्रिक कारणांमुळे जे ऑटोचालक आपल्या परमिटचे नूतनीकरण करू शकलेले नाही त्यांना परमिट नूतनीकरणासाठी संधी देण्यात यावी आणि मीटरचा सुरुवातीचा दर २० रुपये व त्यानंतर प्रत्येक किलोमीटरमागे १८ रुपये करण्यात यावा. शिवाय जर मूळ मालकाचा मृत्यू झाला असेल व जर ऑटो परमिटसह विकत घेतला असेल तर त्याला हस्तांतरण करण्यासाठी संमती पत्राची आवश्यकता पडणार नाही या महत्त्वाच्या मागण्या होत्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रविभवन येथे संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात आली होती. यावेळी ऑटोचालकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. जे ऑटोचालक सीएनजी, एलपीजी, बायोडिझेल, इथेनॉल इत्यादींचा वापर करून प्रदुषणमुक्त नागपूर करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतील शिवाय मीटरने ऑटो चालवतील, त्यांच्या वाहनाला २० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्याचा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मुदत संपलेल्या परवान्याच्या नूतनीकरणाचे अर्ज विलंब शुल्कासह स्वीकारण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती देण्यात आली. परवाना हस्तांतरणाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर परवानाधारकास नोंदणीकृत डाकेने ७ दिवसांची मुदत देऊन कार्यालयात हजर राहण्याबाबत कळविण्यात येईल. जर तो हजर झाला नाही तर आणखी ७ दिवसांची मुदत देण्यात येईल. जर दोन्ही नोटीसनंतर जर परवानाधारक उपस्थित झाला नाही तर परवाना हस्तांतरणाचा निर्णय हस्तांतरणाच्या गुणवत्तेनुसार करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला.