दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि आपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक करून हल्ला केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होता. त्यानंतर आम आदमी पार्टीने केलेले हे आरोप फेटाळत अरविंद केजरीवाल यांच्या कारने भाजपाच्या एका कार्यकर्त्याला चिरडल्याचा प्रत्यारोप भाजपाचे नेते प्रवेश वर्मा यांनी केला आहे. या कार्यकर्त्याचा पाय तुटला असून त्याला आम्ही रुग्णालयात घेऊन जात आहोत, अशी माहितीही प्रवेश वर्मा यांनी दिली.
याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये प्रवेश वर्मा म्हणाले की, प्रश्न विचारणाऱ्या जनतेला अरविंद केजरीवाल यांच्या कारने चिरडले. यात दोन तरुण जखमी झाले आहेत. दोघांनाही लेडी हार्डिंग रुग्णालयात नेण्यात आलं आहे. पराभव समोर दिसू लागताच हे प्राणांची किंमत विसरले आहेत. मी रुग्णालयात जात आहे.
प्रवेश वर्मा पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची काळ्या रंगाची कार आम्हाला चिरडत पुढे गेली. त्यात आमच्या एका कार्यकर्त्याचा पाय तुटला आहे. तर दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. एक माणूस ज्याच्याजवळ कुठलंही सामान नव्हते, त्याच्यावरून गाढी चढवून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री जात आहेत. यापेक्षा लाजीवराणी बाब काय असू शकते, असा सवाल प्रवेश वर्मा यांनी विचारला आहे.
तत्पूर्वी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. अरविंद केजरीवाल हे प्रचार मोहिमेवर असताना जमावाने त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. यादरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या कारच्या दिशेने एक दगड येत असल्याचा व्हिडीओ आम आदमी पक्षाकडून शेअर करण्यात आला होता.