Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकारण तापले आहे. आतापर्यंत भाजप आणि आम आदमी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. पण, आता आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या समर्थकांवर दगडफेकीचा आरोप आहे.
AAP ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिृडिओ शेअर केला आहे, ज्यात अरविंद केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे दिसत आहे. याशिवाय, केजरीवालांना भाजप समर्थकांनी काळे झेंडेही दाखवले.
आम आदमी पार्टीने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, 'पराभवाच्या भीतीने घाबरलेली भाजप अरविंद केजरीवालांवर हल्ला करण्यासाठी आपले गुंड पाठवते. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवालांवर प्रचार करताना विटा आणि दगडांनी हल्ला करून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भाजपवालो...केजरीवालजी तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीची जनता तुम्हाला चोख प्रत्युत्तर देईल,' असे आपने म्हटले.
केजरीवालांनी दोन तरुणांना कारने चिरडल्याचा आरोप दुसरीकडे, आपल्या कार्यकर्त्यांवर गाडी चढवल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घटनेचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. केजरीवाल यांनी आपल्या कारने दोन तरुणांना धडक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर भाजप नेते प्रवेश वर्मा लेडी हार्डिंज रुग्णालयात जखमी कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.
नवी दिल्ली जागेवर तिरंगी लढतअरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या जागेवरुन भाजपने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसचे संदीप दीक्षित रिंगणात आहेत. अरविंद केजरीवाल सलग तीनवेळा येथून निवडणूक जिंकले आहेत. यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.