आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एका निवडणूक सभेदरम्यान रामायणातील एका घटनेचा उल्लेख केला. त्यावरून आता त्यांना ट्रोल केले जात आहे. माता सीतेच्या अपहरणाची कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, यानंतर, आता भाजपने त्यांना घेरायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्यांची 'निवडणूक हिंदू' म्हणून खिल्ली उडवली जात आहे.
केजरीवाल सोमवारी सायंकाळी विश्वास नगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी झोपडपट्टीवासीयांना भाजपबद्दल इशारा दिला आणि सीता हरणाची कहाणी सांगितली. केजरीवाल म्हणाले, 'एक दिवस भगवान राम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेलेले असतात. त्यांनी सीतेला त्याच्या झोपडीत सोडलेले असते आणि माता सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर सोपवलेली असते. दरम्यान, रावण सुवर्णमृग बणून येतो. यावेळी, आपल्याला हे हरण हवे आहे, असा आग्रह ती लक्ष्मणाकडे करते. लक्ष्मण म्हणतो की, माझ्यावर आपल्या रक्षणाची जबाबदारी आहे. यावर सीता म्हणते, नाही, मी तुला हरण पकडण्याचा आदेश देते. लक्ष्मणाकडे पर्यायच उरत नाही, तो गेला. यानंतर, रावणाने आपला वेश बदलला आणि माता सीता यांचे अपहरण केले.
पुढे केजरीवाल म्हणाले, "हे भाजपचे लोकही सोन्याच्या हरणांसारखे आहेत, त्यांच्या जाळ्यात अडकू नका, नाहीतर हरण होईल. झोपडपट्टीवासीयांनी सोनेरी हरणाच्या जाळ्यात अडकू नये. आजकाल ते तुमच्या मुलांसोबत कॅरम खेळत येत आहेत, निवडणुकीनंतर ते झोपडपट्ट्या पाडण्यासाठी बुलडोझर आणतील. काळजी करू नका, जोवर तुमचा हा मुलगा जिवंत आहे. मी बुलडोझरसमोर पडून राहीन, पण झोपडपट्टी पाडू देणार नाही.
कथेत काय चुकलं ?- रामायणातील एक कथा सांगताना अरविंद केजरीवाल यांनी काही चुका केल्या, ज्यामुळे भाजप त्यांना ट्रोल करत आहे. केजरीवाल म्हणाले की, भगवान राम अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र, प्रत्यक्षात ते सोन्याच्या हरणाचा पाठलाग करत जंगलात गेले होते. माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की रावण सोन्याच्या हरणाच्या रूपात आला होता, परंतु सत्य हे आहे की मारीच नावाचा राक्षस हरणाचे रूप धारण करून आला होता. रावण ब्राह्मणाच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी आला होता.
भाजपनं केलंय ट्रोल - भाजपचे माजी खासदार आणि नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांना आव्हान देणारे प्रवेश वर्मा यांनी X वर म्हटले आहे की, 'निवडणूक हिंदू अरविंद केजरीवाल यांच्या मते, 'जेव्हा श्री रामजी अन्नाची व्यवस्था करण्यासाठी जंगलात गेले होते, तेव्हा रावण सोन्याच्या हरणाच्या रूपात आला...' पण मी 'निवडनूक हिंदूला' सांगू इच्छितो की, रामायणात, राक्षस मारिच रावणासोबत आला आणि त्याने सुवर्ण मृगाचे रूप धारण केले होते. यानंतर, माता सीतेने लक्ष्मणाला नव्हे, तर भगवान श्रीरामजींना सुवर्ण हरण आणण्यास सांगितले होते, असे आहे 'निवडणूक हिंदू'चं फसवं ज्ञान...!'